उपेक्षित समुदायांना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून वगळण्याचे गंभीर परिणाम होतात. त्याचा परिणाम म्हणजे, हे क्षेत्र ज्या विषमता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच विषमता पुन्हा निर्माण करत राहते.

READ THIS ARTICLE IN

6 min read

मी उपेक्षित समुदायांच्या विकासासाठी स्थापन केलेल्या अनुभूती, या जातविरोधी, इंटरसेक्शनल स्त्रीवादी संस्थेला काही वर्षांपूर्वी एका राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. हा पुरस्कार जिंकला असता तर संस्थेला बरीच विश्वासार्हता आणि निधी मिळाला असता. माझ्या टीमने आणि मी, हा अर्ज भरण्यासाठी कित्येक तास खर्च केले. या प्रक्रियेतील एक टप्पा म्हणजे पुरस्काराच्या सात सदस्यीय ज्युरीनी आम्हाला दिलेली भेट, ज्यांना आमच्या कार्यक्रमांबद्दल आणि आम्ही कसे काम करतो हे जाणून घ्यायचे होते, तसेच आम्ही पुरस्कारासाठी पात्र आहोत का, याचे मूल्यमापन करायचे होते.

घिसाडी भटक्या जमातीतील एक व्यक्ती असल्यामुळे, मला अशा टप्प्यावर पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो ते माहित आहे, त्यामुळे ज्युरीमध्ये एनटी-डीएनटी (NT-DNT), दलित, आदिवासी किंवा इतर उपेक्षित समुदायांतील प्रतिनिधी असण्याची मला अपेक्षा नव्हती. आमच्या समुदायातील लोक या पदांवर असणे अजूनही दुर्मिळ आहे कारण शिक्षण, नोकऱ्या आणि सामाजिक प्रभाव निर्माण करणाऱ्या व्यासपीठांपर्यंत पोहोचताना आम्हाला ज्या व्यवस्थात्मक अडथळ्यांना सामोरे जावे लागते, ते अडथळे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील परिषदा, चर्चासत्रे, फेलोशिप आणि ज्युरीपर्यंत पोहोचतानादेखील कायम येतात. या जागी पोहोचण्यासाठी अनेकदा नेटवर्क, ओळखी आणि सामाजिक भांडवलाची मागणी करतात. आमच्याकडून तळागाळातील माहितीबद्दल तज्ज्ञतेची अपेक्षा केली जाते, मात्र जिथे बसून निर्णय घेतले जातात त्या टेबलावर आम्हाला क्वचितच आमंत्रित केले जाते, जरी आम्ही प्रशिक्षक, लेखक किंवा संशोधक बनलो तरीही. माझे विचार सहजपणे स्वीकारले जातील अशाप्रकारे मांडण्यासाठी, या क्षेत्राची भाषा आत्मसात करायला मला 35 वर्षे लागली.

त्यामुळे ज्युरीचा प्रत्येक सदस्य ब्राह्मण-सवर्ण होता, याचे मला फारसे आश्चर्य वाटले नाही. त्यांना कोणत्याही प्रादेशिक भाषेची माहिती नव्हती आणि त्यांना हिंदीचेही अत्यल्प ज्ञान होते, ज्यामुळे भेटीदरम्यानचा तणाव अधिकच वाढला.

What is IDR Answers Page Banner

आमच्या वेदना आणि संघर्षाबद्दल त्यांना असलेली माहिती ही प्रत्यक्ष अनुभवातून आलेली नसून पुस्तकी स्वरूपाची होती, ज्याच्यावर पाश्चात्य साहित्याचा बराच प्रभाव होता, असे मला जाणवले. ते आमचे काम जाणून घेण्यासाठी आले होते, पण कधी कधी असे वाटले की ते मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. जेव्हा मी आमचे कार्यक्रम हे NT-DNT समुदायांच्या प्रत्यक्ष जगलेल्या अनुभवावर कसे आधारलेले असतात हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा चर्चेचा विषय बदलायचा. आम्ही अनेक वर्षांपासून यशस्वीपणे राबवत असलेल्या कार्यक्रमांची रचना आणि अंमलबजावणी कशी असावी याबद्दल मलाच सांगितले जायचे. आमच्या ज्ञानाची पूर्णपणे दखल घेतली जात नव्हती. या क्षेत्रातील काहींना माझे बोलणे बचावात्मक वाटू शकते. पण माझी खरोखरच एक विनंती आहे की तळागाळातून आलेल्या व्यक्तीवरील नेतृत्वाचा ताण आणि साधनसंपन्न पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचा ताण हे एकसारखे असू शकत नाही, हे समजून घ्यावे.

माझ्या कर्मचाऱ्यांपैकी चाळीस टक्के लोक हे डोंबारी आणि तंबूमध्ये राहणाऱ्या भटक्या समुदायातील आहेत आणि ते सर्व दलित किंवा आदिवासी आहेत. माझ्या टीमला सहन करावा लागणारा भेदभाव, अन्याय आणि मानसिक आरोग्याचा ताण याची तीव्रता किती आहे, हे ज्युरी सदस्यांना पटवून देणे मला कठीण गेले. आणि ते स्वतः पूर्वग्रहदूषित असू शकतात याचीही त्यांना फारशी जाणीव असेल असे वाटले नाही.

समानता अशी निर्माण होत नाही. प्रस्थापित जातींच्या लोकांनी प्रत्यक्ष कामासाठी वेळ देणे आवश्यक आहे; तळागाळातील काम प्रत्यक्षात कसे चालते, यात सहभागी होणे आवश्यक आहे; आणि सामाजिक भांडवल, शिक्षण आणि विशेषाधिकार यांच्या जोरावर मिळालेली तज्ज्ञता थोडी बाजूला ठेवणे आवश्यक आहे.

ही काही एकच घटना नव्हती, पण मला अनेक वर्षांपासून जे माहित होते त्याला या घटनेने पुष्टीच दिली: विकास क्षेत्राला परिषदा, पॅनेल, फेलोशिप्स, ज्युरी आणि इतर निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये उपेक्षित समुदायातील लोकांची गरज आहे. मला माहित आहे की हा काही नवीन विचार नाही. पण आमच्यासारख्यांना प्रामुख्याने तळागाळापर्यंत मर्यादित ठेवून आणि आमच्या जगलेल्या अनुभवांना धोरण, कार्यक्रम आणि निर्णय घेण्यासाठीचे आवश्यक ज्ञान न मानता, केवळ वैयक्तिक किस्से मानून हे क्षेत्र काय गमावत आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे असे मला वाटत नाही.

हो, हे अजूनही जात आणि वर्गाशी संबंधितच आहे

उपेक्षित समुदायातील लोक सामाजिक क्षेत्रातल्या तळागाळातील कामाचा संपूर्ण भार उचलतात. पण आम्ही जेव्हा या मर्यादांच्या पलीकडे जाऊन विचारवंत, प्रशिक्षक, लेखक किंवा संशोधक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. फेलोशिपसारख्या साध्या गोष्टीसाठी अर्ज करतानाही, आम्ही जे काम केलेले आहे ते एका ‘स्वीकार्य’ भाषेत आणि चौकटीत बसवावे लागते, आणि त्यामुळे आम्ही जगलेल्या अनुभवांना कमी लेखले जाते.

donate banner

आमची धोरणे, आमच्या प्रक्रिया आणि आम्ही जे निर्माण केले आहे, मग ते साहित्य असो, कामाची पध्दत असो किंवा टीम बनवण्याची क्षमता असो, ते सगळे दुय्यम ठरते. व्यावसायिक मानसिकता वरचढ ठरते—’स्केलेबिलिटी’ची एक प्रतिगामी संकल्पना, ज्यामध्ये यशाचा अर्थ वेग, त्वरित परिणाम आणि मोजता येईल अशी फलनिष्पत्ती, असा असतो. आणि ते देखील क्लिष्ट भाषेत व्यक्त केले जाते, ज्यामुळे आम्हाला अधिकच उपेक्षित वाटते.

आधीच प्रस्थापित असलेल्या जातींना अधिक ताकद मिळत आहे आणि उपेक्षित समुदायातील लोकांना अनेक प्रकारे अधिक असुरक्षित वाटायला लावले जाते.

मी हे वारंवार घडताना पाहिले आहे. आमची मुलाखत घेणारे लोक, क्षेत्रीय भेटी देणारे, आमचे फॉर्म वाचणारे किंवा ज्युरी आणि निवडण्याचे काम करणारे, यांच्यापैकी एकही माझ्या स्वतःच्या NT-DNT समुदायातील किंवा कोणत्याही जमातीतील नव्हता. मी दलित किंवा SC समुदायातील कोणालाही क्वचितच पाहिले आहे. निर्णय घेणाऱ्या लोकांचे वर्तुळ हे प्रस्थापित वर्चस्ववादी एकजुटीच्या आधारावर टिकून आहे; विशेषतः ब्राह्मणवादी एकजुटीच्या आधारावर. त्यांची स्वतःची एक स्वतंत्र व्यवस्था आणि संपर्क आहेत, ज्यामध्ये प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण आहे. हे ब्राह्मणवादी पितृसत्ताक व्यवस्थेचेच आणखी एक रूप आहे, जी आजही वंचित घटकांचे शोषण करत आहे.

आधीच प्रस्थापित असलेल्या जातींना अधिक ताकद मिळत आहे आणि उपेक्षित समुदायातील लोकांना अनेक प्रकारे अधिक असुरक्षित वाटायला लावले जाते.

पहिली गोष्ट म्हणजे, संविधानावर आधारित वैचारिक मांडणीबद्दल, शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीबद्दल आणि सावित्रीबाई, अक्का महादेवी आणि मुक्ता साळवे यांच्यासारख्या व्यक्तींनी पुढे नेलेल्या तळागाळातील स्त्रीवादी विचारांबद्दल एक प्रकारची अंतर्गत अस्वस्थता आहे. आमच्यासारख्या लोकांनी या विचारांना स्थान मिळवून देण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत, परंतु सत्ताधारी लोक याला प्राधान्य देत नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे, विकास क्षेत्र केवळ प्रतिनिधित्वावरच बोलते, की काही दलित आणि आदिवासी यांची उपस्थिती असावी, परंतु आरक्षणाबद्दल बोलत नाहीत. जेव्हा धोरण, प्राधान्यक्रम आणि आमच्या स्वतःच्या संस्था आणि चळवळींच्या रचनेत आरक्षणासारखी तत्त्वे समाविष्ट करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा संधींची उपलब्धता अत्यंत मर्यादित असते.

तिसरी गोष्ट म्हणजे, उपेक्षित समुदायांना सहन करावा लागणारा त्रास हाच आमच्या अस्तित्वाला मान्यता मिळवून देणारा एकमेव मार्ग आहे. मी, दीपा, मला माझ्या दुःखाबद्दल आणि चिंतेबद्दल बोलण्याची मुभा आहे. पण जेव्हा मला एखाद्या मॉड्युलबद्दल, संकल्पनेबद्दल, आशयाबद्दल किंवा संशोधनाबद्दल बोलायचे असते, तेव्हा फारशी संधी दिली जात नाही. आमच्या कामाला ‘समुदाय-आधारित’ म्हणून कमी लेखले जाते, जणू काही ते फक्त तळागाळापुरतेच संबंधित आहे. परंतु प्रत्यक्षात या विषयांवर जागतिक चर्चा होत आहेत आणि लोकांनी त्या स्तरावर सहभागी होऊन त्यांच्याकडून शिकणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष अनुभव घेतलेले फारच कमी लोक, वेदना आणि दुःखाच्या चर्चांच्या पलीकडे जाऊन त्या अनुभवावर आधारित व्यावसायिक स्थान निर्माण करताना मला दिसतात.

चौथी गोष्ट म्हणजे, ना-नफा संस्था आणि चळवळींमध्ये, टीम लीडर आणि संयोजक यांसारखी सर्वोच्च पदे प्रामुख्याने प्रस्थापित जातीतील लोकांच्या ताब्यातच आहेत.

मग हे असे का घडते? ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, ते लोक स्वतःच्या सल्ल्यांनुसार अंमलबजावणी का करू शकत नाहीत, स्वतःचे स्थान का मिळवू शकत नाहीत आणि स्वतःची सत्ता का टिकवू शकत नाहीत?

Colorful stained glass spiraling across a chapel ceiling--social sector
उपेक्षित समुदायातील लोक सामाजिक क्षेत्रातल्या तळागाळातील कामाचा संपूर्ण भार उचलतात. | चित्र साभार: Pixabay

या क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काय लागते

सुरुवातीला स्वतःसाठी स्थान निर्माण करणे अत्यंत कठीण होते आणि मी अजूनही आव्हानांचा सामना करते.

तुम्ही ठराविक पद्धतीने लिहू आणि बोलू शकता का, यावर तुमचे मूल्यमापन केले जाते. मी भटक्या जमातीतील असल्यामुळे, माझी स्वतःची शब्दसंपदा या क्षेत्रांच्या अपेक्षेपेक्षा वेगळी आहे. मला जुळवून घेता येण्यासाठी 35 वर्षे लागली.

आम्हाला कोणतेही मार्गदर्शक नाहीत. जेव्हा मी माझ्या संस्कृतीला अधिक खोलवर समजून घेऊ लागले, तेव्हा मला जाणवले की माझे अन्न, भाषा, विधी आणि विश्वास प्रणाली, जे ब्राह्मणेतर होते, त्या सर्वांवर केवळ मागासलेले आणि अंधश्रद्धाळू असा शिक्का मारला गेला होता. जेव्हा मी या सगळ्याला योग्यरित्या मांडायला शिकले, तेव्हा मला समजले की ते स्त्रीवाद, लोकशाही आणि सामूहिकतेचे प्रकार आहेत जे 2,000-2,500 वर्षे जुने आहेत.

या क्षेत्रांमध्ये, मला ठाम भूमिका घ्यावी लागली आणि माझी स्वतःची भूमिका निश्चित करावी लागली. ज्या क्षणी तुम्ही ठाम भूमिका घेता, त्या क्षणी, तुम्ही तुमच्याबद्दल आतापर्यंत बोलल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे स्वीकारार्ह बनवता. जर तुम्ही संस्था मोठी करत असाल, तर तुम्हाला तळागाळातील टीम-बिल्डिंगची उदाहरणे आणि कथानके स्वतःहून जाणीवपूर्वक तयार करावी लागतात. त्याचा प्रत्येक भाग म्हणजे एक आव्हान आहे, कारण त्यासाठी पैसा, ओळखी आणि सामाजिक भांडवल लागते आणि माझ्याकडे यापैकी काहीही नव्हते. असे विशेषाधिकार नसताना, फेलोशिप, पुरस्कार आणि निधीद्वारे तुम्ही तुमची स्वतःची वैधता निर्माण करण्याची अपेक्षा ही व्यवस्था करते.

अखेर जेव्हा आम्ही या टप्प्यावर पोहोचू, तेव्हा आम्ही न्याय आणि समावेशकतेच्या दिशेने लक्षणीय बदल घडवून आणू शकू, कारण आमची वचनबद्धता त्यासाठीच आहे —समावेशकतेच्या प्रदर्शनासाठी नाही.

वगळले जाण्याची किंमत

तळागाळातील सहभागाला सक्षम करणारी रचना तयार करण्यात अपयश आल्यास होणारे परिणाम गंभीर असतात:

  1. हे क्षेत्र आहे तसेच राहते. जर उपेक्षित समुदायांचा सहभाग, नेतृत्व, चर्चा आणि गोष्टी समाविष्ट केल्या नाहीत, तर या क्षेत्राच्या कामाच्या पद्धतीत काहीच बदल होणार नाही. जात, वर्ग, पाश्चात्य अनुभव यांच्यावर सत्तेचे अवलंबित्व कायम राहील आणि ती ठराविक भाषा बोलणाऱ्या आणि ठराविक संसाधने असलेल्या लोकांच्याच हातात राहील. उपेक्षित समुदाय कठपुतळ्या बनून हालचाल करताना, हसताना, डुलताना आणि गाताना दिसतील, पण त्यांच्या दोऱ्या मात्र कधीही त्यांच्या स्वतःच्या हातात नसतील.
  2. हक्क आणि स्वायत्तता तळागाळापर्यंत पोहोचणार नाहीत. जर या क्षेत्रांमध्ये प्रवेश करताना येणारे अडथळे दूर केले नाहीत, तर आम्ही ज्या हक्क, स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेसाठी लढत आहोत, ते कधीही जमिनीपर्यंत पोहोचणार नाही. बहुतेक तळागाळातील संस्थांना त्यांची कार्यालये फक्त चालवण्यासाठी देखील संघर्ष करत आहेत आणि कोणालाही पाच वर्षांच्या खात्रीशीर निधीचीही शाश्वती वाटत नाही. हक्क-आधारित संस्थांना पूर्वीपेक्षा जास्त फटका बसत असल्याने, क्षेत्राला त्यांच्यासाठी अंतर्गत स्तरावरून पाठिंबा निर्माण करणे आवश्यक आहे. जेव्हा एखादी संस्था बंद पडते, तेव्हा त्याच्याशी संबंधित प्रत्येक कामगारावर आणि समुदायातील सदस्यावर त्याचा परिणाम होतो.
  3. बौद्धिक संपदेचा सातत्याने गैरवापर होत राहतो. भटक्या आणि आदिवासी समुदायांशी संबंधित माहिती व ज्ञानाचे प्रचंड बौद्धिक आणि सांस्कृतिक मूल्य आहे, तरीही या समुदायांच्या परवानगीशिवाय त्यांच्याकडून सातत्याने माहिती, अभ्यासप्रकरणे आणि अनुभव गोळा करून वापरला जातो. जरी संमती घेतलेली असली, तरी सत्तेच्या समीकरणामुळे लोकांना नाही म्हणता येत नाही. एकदा कोणी काही बोलले की, न विचारता कोणीही त्याची पुनर्रचना, पुनर्विक्री किंवा पुनर्निर्मिती करू शकते.

विकास क्षेत्रातील समावेश केवळ उपेक्षित समुदायांना त्यांच्या वेदनांबद्दल बोलण्यासाठी आमंत्रित करण्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. याचा अर्थ त्यांना ज्युरी, पॅनेल आणि बोर्डवर जागा देणे; त्यांच्या ज्ञानासाठी त्यांना मोबदला देणे; आणि धोरण आणि पद्धती ठरवताना त्यांच्या ज्ञानाचा आधार घेणे असा होतो. तळागाळातील समुदायांच्या प्रश्नाचा भार आम्ही उचलावा अशी अपेक्षा हे क्षेत्र करते, परंतु इतरच कोणीतरी निर्णय घेत असते. जोपर्यंत हे चित्र बदलत नाही, तोपर्यंत दोऱ्या दुसऱ्यांच्या हातात राहतील. आमचे ज्ञान म्हणजे वैयक्तिक किस्से नाहीत. न्याय प्रस्थापित करण्याचा दावा करणाऱ्या प्रत्येक कामाचा पाया आहे.

—

अधिक जाणून घ्या

  • सत्तेच्या गुंतागुंतीच्या समीकरणांमुळे सामाजिक समस्या कशा निर्माण होतात आणि ही गुंतागुंत समजून घेण्यासाठी पॉवर मॅपिंगची मदत कशी होऊ शकते, याबद्दल वाचा.
  • ज्योतिराव फुले यांनी जात आणि श्रेणीव्यवस्थेवरती केलेल्या टीकेबद्दल वाचा.
donate banner
We want IDR to be as much yours as it is ours. Tell us what you want to read.
ABOUT THE AUTHORS
दीपा पवार

दीपा पवार ही एक एनटी-डीएनटी कार्यकर्त्या, संशोधक, लेखिका, प्रशिक्षक आणि सल्लागार आहे. ती घिसाडी भटक्या जमातीशी संबंधित आहे आणि तिला स्थलांतर, गुन्हेगारीकरण आणि सामाजिक असुरक्षिततेचे अनुभव आले आहेत. ती अनुभूती या जातविरोधी, आंतरविभाजित स्त्रीवादी संघटनेची संस्थापक आहे. तिच्या दीर्घ कारकिर्दीत, दीपाने एनटी-डीएनटी, आदिवासी, ग्रामीण आणि बहुजन समुदायातील लोकांसोबत काम केले आहे. तिचे लक्ष केंद्रित क्षेत्र म्हणजे लिंग, मानसिक आणि लैंगिक आरोग्य, स्वच्छता आणि संवैधानिक साक्षरता. ती उपेक्षित समुदायांसोबत चळवळ उभारणीवर देखील काम करते आणि त्यांना त्यांचा इतिहास आणि वारसा परत मिळवण्यास मदत करते.

Deepa Pawar-Image
Deepa Pawar

COMMENTS
READ NEXT